माधव आपटे - एक सामान्य माणूस. बॅंकेत चांगल्या पदावर नोकरी, बायको, दोन मुलं, संसार सुखाने करावा, अशी इच्छा मनात, पण तत्त्वं सांभाळताना त्याची कसरत व्हायची... असत्य, लाचलुचपत, रोजच्या जीवनात घडीघडी होणारी फसवणूक या सगळ्याला त्याचा विरोध! .......एक दिवस छोट्याशा कारणावरून त्याच्या भावनांचा उद्रेक होतो अन् "माधव आपटे' जग बदलायला निघतो - संतापतोही! "डोंबिवली फास्ट' पाहताना वाटत होतं आपणही उठावं, जावं, तोडफोड करत फिरावं- सिनेमा संपला आणि लाज वाटली मला. सगळीकडे कौतुक झालं त्या कथानकाचं, अभिनयाचं, त्यात दाखवलेल्या सत्य परिस्थितीतचं - तरीही लाज वाटली, की या विषयावर सिनेमा काढतो आपण. असे विषय सिनेमातून मांडावे लागतायेत, आपल्याच समाजाला नागवं करतोय सर्वांसमोर आणि त्याचंच कौतुक करतोय. यावर कृती सोडाच, विचारही होत नाही, हे त्याहून खेदजनक!तत्त्वे बाळगणारा मूर्ख ठरतो. समाजच त्याला मूर्ख ठरवतो, "लोक' त्याला वेडा ठरवतात, म्हणून ती बाळगायची नाहीत! का? त्याचा लोकांना त्रास होतो. सगळं काही लोकांसाठी! याच लोकांच्यात मिसळायचं. त्यांचं म्हणे ऐकायचं, लोकांशी चांगलं वागायचं, कोणाला दुखवायचं नाही. आयुष्यात याच लोकांपेक्षा "वेगळं' काहीतरी करायचं आणि त्याच वेळी इतर लोकांसारखं वागायचं - लोकांत शोभून दिसेल असं!याच लोकांचा त्रास आपण सहन करायचा, गर्दीत त्यांच्याकडून चेंगरून घ्यायचं, श्वास घुसमटला तरी ओरडायचं नाही, तक्रारसुद्धा करायची नाही! याच्या बदल्यात खूप काही मिळतं, मग गर्दीतली घुसमट, पाकीट मारणारे हात, भ्रष्ट पोलिसांचे संरक्षण, आया-बहिणींकडे पाहणारी वखवखती नजर आणि तोंडातून "ब्र' काढताच जिवे मारण्याची धमकी!"दाम' भक्त झाले सगळे! मिळेल तेवढा आणि मिळेल त्या मार्गाने पैसा कमवायचा... लाचारासारखं पुढेपुढे करायचं. सांडलेल्या साखरेपाशी जशी मुंग्यांची रांग लागते, तसे सगळे पैशांमागे धावतात. सारं काही कमावता, पण काय गमावलंय ते लक्षात येत नाही.सगळं पाहतोय पण करता काही येत नाही. मी एकटाच नाही सगळेच पाहताहेत. त्याने घुसमट वाढतीय मनातली. समाज बदलला पाहिजे. आजकाल वाईट दिवस आलेत फार, भविष्य धोक्यात आहे या देशाचं, हे विषय गप्पा मारायचे झालेत. एकत्र जमले की दारू ढोसत समाजकल्याणाच्या गोष्टी करायच्या, तावातावात बोलायचं. नशा उतरली, की समाजसेवेची नशाही आपोआपच उतरते. रोजच्या व्यवहारात कोणाशी या विषयावर बोलाल, तर "सोडना रे! कशाला डोकं चालवतो, पैसा कमवायचा! बाकी दुनिया गेली तेल लावत,' असं उत्तर मिळतं. सामान्य माणसांनी या सगळ्यांची इतकी सवय करून घेतली आहे, की हे चक्र नको त्या दिशेने फिरतंय याची त्याला जाणीवच होत नाही! त्यांनी पटवलंय मनाला, की हे जीवन असंच आहे, असंच जगायचंय आता... समाज समाजच राहणार आणि आपण सामान्य मागमूसच! "डोंबिवली फास्ट' सारखा चित्रपट आपण किती "फास्ट' विसरलो! असे अनेक चित्रपट येतील, कौतुक होईल, पुरस्कार मिळतील आणि इतिहासजमा होतील... कोणाला वेळ आहे हे "असलं' लक्षात ठेवायला? एकच सांगावं वाटतंय, मानेवर तलवार ठेवून जगतोय आपण, मान हलवली तर कापली जाईल, हलवली नाही तर अवघडेल - मरेपर्यंत! कापली जाण्यापेक्षा अवघडून मेलेलं पसंत करतायेत सारे... दुसरं का?
- सोहम सबनीस
1 comment:
THIS ARTICLE WAS PUBLISHED IN SAKAL PAPER ON 25th June O7
Post a Comment